मनी माझिया नटले गोकुळ
मी राधा तू कान्हा प्रेमळ
वाजविता तू मधुर बासरी
नंदन माझ्या फुले अंतरी
फुटते घागर, भिजते साडी
खट्याळ हसते कालिंदीजळ
मथुरेच्या रे वाटेवरती
आडविसी तू धरुनी हाती
खुशाल लुटिसी दहिदुधलोणी
गोपसख्या, तू भारी अवखळ
यमुनाकाठी रास रंगतो
रमतो आपण, मीपण हरतो
अंध जगाला कशी दिसावी
अपुली प्रीती, अपुले गोकुळ ?