भाग्यवती मी भाग्यवती ग
भाग्यवती मी भाग्यवती
देवदयेने मला लाभली
जगावेगळी श्रीमंती
आनंदाचे निळे सरोवर
तसे सुखाने भरलेले घर
प्रीति-शांतिची हसरी कमळे
सदा तयावर तरंगती
चंद्र नभीचा खाली आला
तिलक कपाळी माझ्या झाला
मीच माझिया सौभाग्याची
महती सांगू किती किती
दुःख माझिया दारी येते
थबकुनि दबकुनि उभे राहते
गंध सुखाचा पिउनि तयाचे
विचार काळे विरघळती