दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणात
त्या सगळ्या बकुळफुलांची शपथ तुला आहे
शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस, “चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा !”
फुलांतल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे
भुरभुरता पाउस होता सोनिया उन्हात
गवतातुन चालत होतो मोहुनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे
हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटुनि येती असे अंतरंगी
या उदास आभाळाची शपथ तुला आहे