Skip to content

अनुपमेय हो सुरूं युद्ध,Anupamey Ho Suru Yuddha

  • by
fb-site

नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें

सशंख राक्षसगण तो दिसला

कष्णघनांवर बलाकमला
मुखांतुनी शत गर्जे चपला
रणांगणावर कोसळलें तों पाउस बाणांचे

नाचत थय थय खिंकाळति हय
गजगर्जित करि नादसमन्वय
भीषणता ती जणूं नादमय
त्या नादांतच मिळले पदरव प्लवग-राक्षसांचे

दंत दाबुनी निज अधरांवर
वानरताडण करिती निशाचर
नभांत उडती सदेह वानर
शस्त्र म्हणुन ते घाव घालिती वृक्ष-पर्वतांचे

“जय दाशरथी, जय तारासुत”
प्रहार करिती वानर गर्जत
झेलित शस्त्रां अथवा हाणित
भरास आलें द्वंद्व जणूं कीं महासागरांचे

गदा, शूळ वा लागुन शक्ति
राक्षस वानर घेती मुक्ति
रणांत पडती अपुल्या रक्तीं
‘जय लंकाधिप’ घोष घुमविती अरी वानरांचे

द्वीप कोसळे, पडला घोडा
वर बाणांचा सडा वांकडा
‘हाणा मारा, ठोका तोडा’
संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे

रणांत मरतां आनंदानें
मांसकर्दमीं फुलतीं वदनें
तींहि तुडविलीं जातीं चरणें
रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे

कलेवरावर पडे कलेवर
ऋक्ष, निशाचर, नकळे वानर
मरणांहुनही शौर्य भयंकर
कैक योजनें उडुनी जाती भाग अवयवांचे

चक्रें, चरणें, हस्त, लांगुलें
शुंडा, ग्रीवा, शिरें, पाउलें
पडलें तें शतखण्डित झालें
प्रलयकाळसें अंग थरारे धरणी-गगनाचें

द्वंद्व तरी हो कुठें कुणाचें
काळमुखांतुन कोणी वांचे
कुठे कुणाचें कबंध नाचे
धुमाळींत त्या कोणा नुरलें भानच कोणाचें

Leave a Reply

Your email address will not be published.